Total Pageviews

Tuesday, December 31, 2013

स्वामी विवेकानंद आणि त्यांची (आम्ही पूर्ण करावयाची) मोहिमेची योजना

स्वामी विवेकानान्द्नांनी १८९७ साली मद्रास येथील व्हिक्टोरिया सभागृहात " माझ्या मोहिमेची योजना " हे शतकातील सर्वोत्तमापैकी एक व्याख्यान दिले. भारताचा तरुण,त्याकडून देशाच्या अपेक्षा आणि त्या अपेक्षापूर्तीसाठी तरुण पिढीबद्दल स्वामीजींच्या अपेक्षा असा सुंदर मिलाफ या भाषणात आहे.सहस्त्रकातील, जगातील सर्वोत्तम प्रेरणादायी भाषनांपैकी ते एक आहे. अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उन्नतीसाठी कोणते रचनात्मक बदल आवश्यक आहेत आणि भारतीयांचे पुनरुत्थान होण्यासाठी कोणत्या कार्यप्रणालीची गरज आहे याचे उद्बोधन स्वामीजींनी केले आहे. हे भाषण नवभारतासाठी आहे.

मात्र फक्त इथेच त्याचे महात्म्य संपत नाही. आज शतक बदलले, संदर्भ बदलले,
स्वातंत्र्याला पासष्ट वर्षे उलटली तरी हे भाषण स्वामीजींच्या स्वप्नातील तरुण, त्याची आवश्यकता तसेच आहे. त्यामुळे स्वामीजींची मोहीम आजही अपूर्ण आहे . आणि ती पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुणाची आहे विशेषतः महाराष्ट्राने त्यात पुढाकार घ्यावा.

विवेकानंदांचे विचार स्वप्न, ज्याला ते त्यांची मोहीम म्हणतात सगळ आज आम्ही पुन्हा आमच्या हृदयात कोरून ठेवाव अस आहे.

वेदांताचा प्रसार पाश्चात्य देशात केल्यानंतर स्वामीजी भारतात आले आणि भारतभूमीच्या या सुपुत्राने तरुण बांधवांना झोपेतून जाग करायला सुरुवात केली. त्यामुळे या विषयाला हात घालण्यापूर्वी स्वामीजींच्या वैचारिक जाणीवेचा थोडा परामर्श घेऊया.

उगाच देव देव करून लोकांना ढोंगी अध्यात्म शिकवणारा तो बुवाबाबा नव्हता. स्वामीजींनी देवत्वावर अविश्वास दाखवला नाही.नास्तिक नरेंद्राचा देवीशी संवाद साधणारा विवेकानंद झाला हे जितक सत्य तितक हे सुद्धा कि स्वामीजींनी राष्ट्रीयवाद आणि तरुण भारताची राजकीय गरजेबद्दल सुंदर विधाने केली आहेत. त्यांनी देव आहे कि नाही हि यावर स्वतःची समजूत घातली आणि देशाला त्यांनी राष्टवाद शिकवला आणि त्यांनी तरुणांना राष्ट्रप्रेमाची दिक्षा दिली. म्हणून त्यांना "योद्धा संन्यासी " म्हणतात.

धर्म
स्वामीजींनी राजकारण आणि अध्यात्म दोन्ही विषयांवर प्रबोधन केल. त्यांनी अध्यात्माच कधी राजकारण केल नाही पण राजकारणासाठी "धर्म " हा अवघ्या भारतीयांना एक दुवा आहे हे त्यांचे ठाम मत होते. ते म्हणतात प्रत्येक देशाचा काही स्वभाव असतो. लोकांना गोष्ट पटवून देण्यासाठी ते तत्व महत्वाचे असते. अमेरिकेत प्रत्येक गोष्ट मानवी समान मुल्यांवर तोलली जाते, इंग्लंड मध्ये राजकारण राष्ट्रीयत्व गोष्टीभोवती पिंगा घालते तसेच अवघ्या भारताला एकसंघ करण्याची ताकद धर्मकारणात आहे. त्यामुळे स्वामीजींनी आपल्या लोकांना राजकारण अध्यात्माच्या मार्गाने समजावून सांगितले. हीच गोष्ट रामदास स्वमिन्निसुद्धा केली होती.

हिंदुधर्म
नि:संशय विवेकानन्न्दांनी वैश्विक धर्माची संकल्पना मांडली. मात्र तो धर्म हिंदुधर्मातील उदात्त तत्वज्ञानावर आधारलेला आहे. हिंदुधर्माची थोरवी गाताना स्वामीजी म्हणतात कि "मी अशा धर्माचा प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर आलो आहे जो अतिशय प्राचीनतम आहे आणि तो सर्व धर्माची सूत्रे आपल्या कवेत सामावून घेतो". हिंदू धर्माचे मर्म वेद आणि वेदांतात आहे हे स्वामीजींनी जाणले. ते म्हणतात ज्याला वेद ठाऊक नाहीत त्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. वेदांताच्या म्हणजे उपनिषदांच्या तत्वज्ञानावर त्यांनी भर दिला. अमेरिकेत वेदांताचा प्रसार केला. हा आपला आजचा विषय नाही. वेदांताच्या विशेषतः अद्वैतवादाच्या तत्वज्ञानावर स्वामीजींनी आपले अवघे हिंदू धर्माच्या विवेचनाचे फलित सांगितले. स्वामीजींच्या अमेरिकेतील कार्याचे फलित हे कि जेव्हा स्वामीजींनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान अमेरिकेत गायले तेंव्हा पाश्चात्य जगातला कळले कि भारतात धर्मज्ञानाची अजिबात कमतरता नाही आणि मिशनरी सांगतात तसे अज्ञान तर अजिबात नाही. विवेकानान्द्नामुळे मिशनर्यांचे भारतात येणे आणि हिंदुधार्मियांना बाटवणे कमी झाले.

त्यामुळे स्वतः हिंदू संन्यासी म्हणवून वेद वेदांताचे अमृत स्वतः पिउन पाश्चात्य जगताला त्याची चव पाजणारा हा प्रकांडपंडीत जेंव्हा भारतात येतो तेंव्हा तो तरुण पिढीला शिकवत नाही, राष्ट्रवाद शिकवतो . कारण अज्ञान दैन्य आणि भुकेने कळवळनार्या देशाला वेदांताची नाही कर्मवादाची गरज आहे हे तो द्रष्टा जाणतो. बुडणार्याला वेदमंत्रांचा नाही तर काठीचा आधार देतो. म्हणूनच तो संन्यासी आहे पण योद्धा आहे. तो आपल्या लोकांना देव सुद्धा शिकवत नाही म्हणतो ,"पुढील पन्नास वर्षांसाठी वर्षांसाठी राष्ट्र आणि केवळ राष्ट्र हेच तुमचे एकमेव दैवत असले पाहिजे"


माझ्या मोहिमेची योजना
राष्ट्रनिर्माण आणि भूमिका
अवघ्या विश्वाला भारताची नवी ओळख करून देणारा हा क्रांतिकारक स्वतःला खारीचा वाटा समजतो . स्वामीजी म्हणतात ," स्वतः ईश्वराची जागा घेऊन समाजाला हे करा हे करू नका असे आदेश मला द्यायचे नाहीत. रामाच्या सेतूवर अल्पशी वाळू आणून टाकणाऱ्या खारीप्रमाणे व्हावयाचे आहे. या अद्भुत राष्ट्रयंत्राने अनेक युगे कार्य केले आहे."
"राष्ट्र जीवनाची अद्भुत सरिता आपणासमोर आहे


इतिहास आणि भारतीय राष्ट्रजीवन
तरुणांना उद्दीपित करण्याच्या कार्यात विवेकानन्न्दांच्या मते आपल्या राष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि संस्कृती महत्वाची भूमिका बजावतील. आपल्या भारत यात्रेत स्वामीजी ,दक्षिण टोकाला गेले तेंव्हा कन्याकुमारी च्या पुढील बेटावरून (विवेकानंद शिळा ) त्यांना भारताचे दर्शन घडले त्याने त्यांचे मन उचंबळून आले कि मी किती सुदैवी आहे जो मी या सुंदर भारतभूमीत जन्माला आलो …स्वामीजी आपल्या तरुण भारत पुत्रांना हीच अनुभूती देऊ इच्छितात .

खरच आपण सुदैवी आहोत कि आपण इतक्या प्राचीनतम धर्माचा अंश आहोत , इतक्या सृजनशील संस्कृतीचा भाग आहोत आणि वीरत्व आणि ज्ञान जिच्या ठायी ठायी आहे अशा मातीत आम्ही जन्म घेतला आहे . एक राष्ट्र म्हणून आपल्या जडण घडणीचा जो सुंदर आणि श्रीमंत असा प्राचीन इतिहास लाभला आहे तसा खचितचकुणास लाभला नाही … रोमची संस्कृती प्राचीन मात्र लौकिकार्थाने एक राष्ट्र म्हणून ते आज जिवंत नाही … तीच बाब ग्रीकच्या राष्ट्राची … भारतात मात्र दोन हजार वर्षांपासून एकच अखंड प्रवाह चालू आहे … त्यात अनेक स्थित्यंतर झाली मात्र या बदलांमध्ये सुसूत्रतेचा जो धागा आहे तो तुटला नाही . यालाच स्वामीजी राष्ट्र सरिता म्हणतात . " हि जी राष्ट्र सरिता आपणासमोर वाहत आहे नव्या जुन्या हजारो प्रकारच्या घटनांनी तिला गती मिळत आली आहे. राष्ट्र जीवनाच्या विकासासाठी ज्या गोष्टी आवश्यक त्या त्याला द्या…."


समाजातील दोष दूर कसे कराल ?

स्वामीजी सकारात्मक दृष्टीने म्हणतात, "कि दोष प्रत्येक समाजात असतात. जसे आपल्यात आहेत तसे पाश्चीमात्यांमध्येही आहेत. आपल्याडे दैन्य आहे तर तिकडे अतिरेक आहे. दु:ख हे सर्वत्र आहे. ते अंगी मुरलेल्या संधीवाताप्रमाणे पायातून घालवले तर मस्तकाकडे जाते. त्यामुळे दु:खावर वरवरचे उपाय शोधून उपयोग नाही. आपले तत्वज्ञान सांगते कि चांगले आणि वाईट यांची युती नित्याचीच सून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत . हे ध्यानात घेऊन समाजातील दोष दूर करण्यासाठी हे कार्य प्रत्यक्ष न करता लोकांस शिक्षण देऊन अप्रत्यक्षरीत्या केले पाहिजे .


सामाजिक सुधारणा

स्वामीजी म्हणतात , "अगोदर सामाजिक सुधारणा हवी असणारे लोक तयार करा। दोषांची जाणीव मुठभर लोकांनाच झाल्याने सर्व राष्ट्र क्रियाशील होणार नाही. प्रथम राष्ट्र सुशिक्षित करा , नंतर कायदे निर्माण करू शकतील असे लोक निर्माण करा , कायदे आपोआप निर्माण होतील . म्हणून सामाजिक सुधार्नेस्तव लोकांना शिक्षण देणे आवश्यक आहे …"

अविचारी सुधारणा करू नका
स्वामीजी म्हणतात "रक्तातील अविचारीपणा घालवा आणि शांत व्हा. इतिहास साक्षी आहे कि अविचारी सुधारणा करण्याचा यत्न झाला तेथे तेथे त्यांचा हेतू पूर्णपणे निष्फळ झाला. केवळ निंदा करून काय साध्य होणार ? लोक म्हणत आहेत व्याख्याने खूप ऐकली, पुष्कळ संस्था पहिल्या वृत्त्पत्रे हवी तेवढी चाळली, पण आम्हास वर काढू शकेल असा हात कुठे आहे? खरे खरे प्रेम असणारी व्यक्ती कुठे आहे? "

स्वामीजींनी सुधारणा वरवरच्या नकोत, मुळापासून हव्यात याचा आग्रह धरला आहे. ते म्हणतात "अनेक सुधारणावादी चळवळी शोभेच्या ठरल्या . सर्व चळवळी पहिल्या दोन वर्णांशीच संबंधित ठेवल्या आहेत . म्हणून स्वामीजी सांगतात सुधारणा मुळापासून येउद्या प्रज्वलित करा आणि त्याला पसरू द्या, म्हणजे भारतीय राष्ट्र निर्माण होइल…

निर्भय व्हा
स्वामीजी तरुणांना सांगतात 'सिंहाप्रमाणे व्हा . निर्भय व्हा . ते म्हणतात भारताचा काही एक संदेश निर्भयपणे पाश्चिमात्य देशांना दिला . तुम्ही निडरपणे तुमचे कार्य पुढे न्या.
ते पुढे सांगतात , "तुम्हाला आर्थिक , शारीरिक अध्यात्मिक दृष्ट्या दुर्बल करणारे जे काही आहे त्याचा विषाप्रमाणे त्याग करा."
स्वामीजींच्या स्वप्नातील तरुण असा आहे ज्याच शरीर काम्बिप्रमाणे असेल आणि मन वज्राप्रमाणे असेल. ते म्हणतात, तुमचे मज्जातंतू शक्तीसंपन्न करा . आपल्याला लोखंडा प्रमाणे स्नायू हवे आहेत. आता रडणे पुरे . आता आपल्या पायावर राहा .


देशाविषयी तळमळ
देशभक्त होण्याची पहिली म्हणजे देशाविषयी प्रचंड तळमळ, दुखाविषयी कळकळ.
"तुमच्या देशवासीयांचे दैन्य पाहून तुमच्या हृदयाला पीळ पडतो काय?देशाच्या दुर्दशेच्या चितेने तुम्हाला ग्रासून टाकले आहे काय?आणि या चिंतेने ग्रासल्यामुळे तुम्हाला तुमचे कुटुंब , घर , संपत्ती तुमचे शरीर याचाही विसर पडला काय? देशभक्त होण्याची हि पहिली पायरी आहे .
लोकांना शिव्याशाप देण्याऐवजी त्यांना खरच मरणोन्मुख अवस्थेतून बाहेर काढू शकता का? देशभक्त होण्याची हि दुसरी पायरी आहे .
आणि सर्व जग खड्ग घेऊन उभे राहले तरी तुम्हाला वाटते ते करण्याचे धैर्य तुमच्यात आहे काय?
तुमच्याकडे या तीन पायर्या असतील तर तुमच्यापैकी प्रत्येकजण अचाट काम करून दाखवेल ."

विवेकानंदांनी एका सक्षम समर्थ देशाचे स्वप्न पाहिले . तो काळ इंग्रजांचा सुर्य भारतावर पूर्ण भारत तळपण्याचा होता . त्यामुळे विवेकानंदांना त्यांच्या भारत भ्रमणात हृदयद्रावक दृश्य दिसले असेल . मात्र दुर्दैवा,ने काही ठराविक उल्लेख गाळला तरी विवेकानंदांनी सांगितलेली परिस्थिती बदलली नहिय. मात्र स्वमिजींनीच सांगितल्याप्रमाणे शिव्याशाप आणि निंदा करण्याचे स्वभाव टाकून अवघ्या लोकास शिक्षित करून काम केले पाहिजे .

विवेकानंदांचे स्वप्न आजच्या काळातही तितकेच समर्पक आहे म्हणजेच अपूर्णही राहिले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली - आजच्या तरुणांची आहे .


विवेकानंदांच्याच शब्दात सांगू गेलो तर -
"माझ्या संतानांनो, आपले हे राष्ट्र्रूपी जहाज लाखो जीवांना भवसागरातून पार करण्याचे कार्य करीत आले आहे ।पण आज कदाचित आपल्या प्रमादामुळे हे जहाज थोडे नादुरुस्त झाले आहे ,त्यात काही छिद्रे पडली आहेत, म्हणून काय त्याला शिव्याशाप देणार आहात?जर या राष्ट्र्रूपी जहाजाला काही छिद्रे पडली असतील तर ती आपण -संतान्नानी बुजवून टाकली पाहिजेत । हे कार्य आपण हृदयाचे रक्त देऊन आनंदाने करूयात आणि जर जमले नाही तर मरण पत्करुयात. "
हर्षद माने
प्रबोधक
९९६७७०६१५०